NDPS Act चे गुन्ह्यात अंमली पदार्थाचे मालाचा झडती आणि जप्ती पंचनामा तयार करणे. (Panchnama for search and seizure of narcotic goods under the NDPS Act)
अंमली पदार्थाचे मालाचा झडती आणि जप्ती पंचनामा.
घटनास्थळावर प्रवेश करणे व आपली (पोलिसांची) तसेच आरोपींची अंगझडती…
1) पोलिसांची अंगझडती…
- झडती घेण्याच्या जागेत प्रवेश करण्यापूर्वी ज्या इसमाचे जागेची झडती घ्यावयाची आहे त्या इसमास बाहेर बोलवावे.
- तो इसम आल्यावर त्यास, झडती घेण्याचा आपला उद्देश स्पष्टपणे कळवावा.
- झडतीमध्ये किंतु – परंतु राहू नये या करीता आम्हा पोलीसांची व पंचाची झडती घ्यावयाची असल्यास तुम्ही घेवु शकता असे त्यांना स्पष्ट लेखी कळवून त्यांनी झडती घेण्याची ईच्छा दर्शविल्यास किंवा न दर्शविल्यास तसे त्यांचे लेखी घेवून स्वाक्षरी पंचासमक्ष घेण्यात यावी. व सदर बाबत झडती पंचनाम्यात उल्लेख करण्यात यावा. कलम 52(1) (N.D.P.S.Act)
- संशयित ईसमाची झडती घेण्यापुर्वी त्यास अगोदर आपण कोण आहोत व कशा करीता अंगझडती घेत आहोत हे स्पष्टपणे समजावुन सांगावे.
- राजपत्रीत अधिकार्या समक्ष किंवा दंडाधिकारी यांचे समक्ष किंवा मॅजिस्ट्रेट समक्ष झडती घ्यावयाची आहे काय? असे विचारून संशयित इसमाने प्रदर्शित केलेल्या इच्छे प्रमाणे झडती घ्यावी.
- झडती मधील या घटणे बाबत त्यास लेखी नोटीस देवून एका प्रतीवर पंचासमक्ष संशयित इसमांची स्वाक्षरी घ्यावी व त्याने राजपत्रीत अधिकाऱ्या समक्ष झडती घेण्यास नकार दर्शविला असल्यास त्या बाबत झडती पंचनाम्यात नोंद घ्यावी. कलम 50(3) (N.D.PS.Act)
- राजपत्रित अधिकार्यासमोर झडती घ्यावयाची किंवा कसे त्या बाबतचे लेखी पत्र देऊन त्यावर आरोपीची सही घ्यावी.
- संशयित आरोपी स्त्री असल्यास :- स्त्री आरोपीची अंग झडती घ्यावयाची असल्यास तिची झडती दुसऱ्या स्त्री शिवाय घेता येणार नाही म्हणुन झडतीस जाताना खात्री करून सोबत स्त्री कर्मचारी किंवा स्त्री पंच घ्यावेत. कलम 50 ( 4 ) (N.D.P.S.Act)
3) आरोपीच्या घर/जागा/वाहन इत्यादीचे झडतीचा/जप्तीचा पंचनामा केला जावा.
- जागेची, घराची अगर वाहनाची झडती या कायद्यामध्ये कलम 82 नुसार प्राधिकृत केलेला अधिकारी, कलम 49 प्रमाणे झडती घेऊ शकतो.
- CRPC कलम 154 प्रमाणे दिली जाणारी पहिली खबर व माल जप्तीचा, झडतीचा पंचनामा हे दोन अत्यंत महत्वाचे मुद्ये आहेत. दोन्ही मधील चुकीची माहिती, विसंगती किंवा कायदेशीर तरतुदीचे काटेकोरपणाकडे झालेले किंचित दुर्लक्ष यामुळे न्यायालयात गुन्हा सिध्द करताना अडचण निर्माण होते.
- गुन्हयाची जागेची मालकी, व चतु:सिमा बर्याच वेळा आरोपीचे सांगणेप्रमाणे नोंदविलेली जाते. अश्या वेळेस हुशार आरोपी मुद्याम चुकीची माहिती देतात. त्यामुळे गुन्ह्याचे प्रत्यक्ष संपरीक्षेचे वेळी दिशा, घर नंबर, मालकाचे नांव, शेजा-याचे नांव हे वेगळेच असल्याचे दिसून येते. त्यासाठी जागेचे वर्णन व चतुः सिमा या खात्रीपूर्वक पाहून त्याची नोंद करावी.
4) आरोपीचे अंगवरील मुद्देमाल दडवायची ठिकाणे…
- कपडे, केस रचना, फेटे, टोप, विंग, चष्मे, श्रवणयंत्रे, लॉकेट, पेन, घडयाळ, लिपस्टिक, अंगावरचे कपडयांचे चोरखिसे, पँडींग, पादत्राणे, फ्रेंक्चरचे प्लास्टर, गरोदरपणा देखावा, बुरखा, विशिष्ट कॅपसुलचे सहाय्याने गुप्त भागात व पोटात इत्यादी.
- प्रत्येक संशयित वस्तु कोठे, कशा अवस्थेत मिळाली. तिचे वजन, आकार, पॅकिंग इत्यादीचा उल्लेख करुनच पुढे झडतीचे काम चालू ठेवावे.
NDPS चे मालाचा जप्ती पंचनामा तयार करणे…
पंचनामा लिहिताना घ्यायची काळजी…
- पोलीस व पंचाना छापा टाकण्यासाठी नेण्यात येणाऱ्या पोलीस वहानांची तपासणी (झडती पंचांनी घ्यावी.) करुन स्टेशन डायरी नोंद करावी. तसा उल्लेख पंचनाम्यात करावा.
- घटनास्थळी पोहचण्यासाठी वापरण्यात आलेल्या मार्गाची नोंद पंचनाम्यात करण्यात यावी.
- संशयितास लक्षात येणार नाही अश्याप्रकारे पोलीस वाहन घटनास्थळापासून नेमके कोठे उभे केले आहे त्या जागेचे वर्णन पंचनाम्यात घेतले जावे.
- उपस्थीत पथकांची विभागनी घटनास्थळाभोवती संशयितास लक्षात येऊ न देता त्यास पकडण्याची योजना कशी केली होती याची नोद पंचनाम्यात करावी.
- संशयीत इसम घटनास्थळावर किती वाजता आला त्याच्या संशयास्पद हालचालीची नोंद तसेच त्याच्या हातात असलेल्या पिशवी / बॅग इत्यादीचे वर्णन पंचनाम्यात घेतले जावे.
- संशयीत इसमावर छापा किती वाजता टाकला त्याची नोंद पंचनाम्यात करावी.
- संशयीतास अटकावून ठेवल्यानंतर सापळा प्रमुखाने स्वतः व पथकातील कर्मचारी तसेच पंच व्यक्ती यांची ओळख / हुद्दा इ. माहीती संशयीतास दिली. संशयीतास पोलीसांकडून अटकाव करण्याचा उद्देश, संशयीताविषयी मिळालेली खबर याची माहीती संशयितास द्यावी व तसा उल्लेख पंचनाम्यात करण्यात यावा.
- संशयीतांची झडती घेण्यापुर्वी त्यांना एन.डी.पी.एस. कायदा 1985 कलम 50 मधील बंधनकारक तरतुदीची माहीती त्यांच्या अवगत भाषेत प्रत्येकाला स्वतंत्ररित्या दिली जावी व तसा उल्लेख पंचंनाम्यात करावा.
- संशयिताची झडती घेण्यापुर्वी पोलीस पथक व पंचाची झडती घेण्यास संशयितास सांगितले जावे तसे पंचनाम्यात नमुद केले जावे.
- संशयिताची झडती NDPS Act चे कलम 41, 42 मध्ये नमूद करण्यात आलेल्या हुद्दयाच्या अधिकाऱ्याने घ्यावी.
- स्त्री आरोपी असेल तर एक स्त्री पंच घेतला जावा.
- स्त्री आरोपीची अंगझडती महिला पोलीस व पंचानी बदीस्त जागेत घ्यावी. घटनास्थळावर तशी बंदिस्त जागा उपलब्ध नसल्यास पोलिसांनी व पंचांनी आड घेण्यास कुठल्या साहित्याचा वापर केला याचा उल्लेख करावा. बंदिस्त जागेचा तपशिल पंचानाम्यात करावा.
- संशयिताकडे आढळून आलेल्या अंमली पदार्थाचा नमुना तपासणी संचावर तपासलेबाबत व सकारात्मक चाचणी आल्या बाबत पंचनाम्यात नमुद करावी.
- अंमली पदार्थाचे जेवढे पॅकेटस् आहेत त्यातील प्रत्येकाचा नमुना स्वतंत्रपणे वेगवेगळया रितीने तपासणी संचावर तपासला पाहीजे व तसे पंचनाम्यात नमुद करावे.
- आरोपीकडे चरस, गांजा, गर्द, इत्यादीचे जेवढे पॅकेटस् सापडतील त्या संगळयांचे वेगवेगळे वजन करावे व प्रत्येक पाकीटाचे जे वजन मिळून येते त्याची नोंद पंचनाम्यात करावी.
- अंमली पदार्थाच्या पावडरच्या एकाच आकाराच्या व रंगाच्या जेवढया पुडया मिळतात त्या सर्व पुडयातील पावडर एकत्र करावी व अशा पावडरचे वजन करावे, त्याची नोंद पंचनाम्यात करावी रिकामे कागद मोजुन त्याचे एक वेगळे पाकीट तयार करावे व मिळालेल्या कागदाची म्हणजेच मिळालेल्या पुडयाची संख्या पंचनाम्यात नमुद करावी.
- मिळालेला माल व त्याचे पॅकिंग गांजा, भांग, इत्यादीं ज्यामध्ये ठेवलेला असेल अशा वस्तु, कुप्या, बाटल्या, पिशव्या, कंटेनर्स यापैकी काहीही नाश न करता त्याही जप्त करुन त्यावर पोलीसांचे व पंचांचे सिल करावे.
- अंमली पदार्थाचा रंग, वास, आकार, व रुप याचे वर्णन पंचनाम्यात करावे.
- सशयित माल हा संशयित का वाटतो? (उदा. रंग, वास इत्यादीचा उल्लेख करावा व त्याचे तपासणीसाठी सॅम्पल घ्यावे, ब्राऊन शुगर, कोकेन, गर्द इत्यादीचे नमुने कमीतकमी 5 ग्रॅम असावे. त्यापेक्षा कमी असणारा पदार्थ संपुर्ण तसाच नमुन्यासाठी घ्यावा. त्याप्रमाणे पंचनाम्यात उल्लेख करावा.
- (बरेचदा CA करीता sample काढतांना रेड मधील अधिकारीना संभ्रम निर्माण होतो) मुद्देमाल किती जप्त होतो त्यावर किती मुद्येमाल C.A. ला पाठवावा याचा निर्णय तपास अधिकाऱ्याने स्वतः, वरिष्ठ अधिकारीशी चर्चा करून घ्यावा किंवा अंमली पदार्थ विरोधी कक्ष येथे संपर्क साधावा. (Reference करीता Narcotics Control Bureau या कार्यालयाकडून प्रसिद्ध झालेली मार्गदर्शिका आपणास पुरवीत आहोत. या लिंक वर क्लिक केल्यास आपण या वेबसाइट चे कार्यक्षेत्राबाहेर जाणार याची नोंद घ्यावी.)
- जप्त केलेला चरस 100 ग्रॅम किंवा अधिक असल्यास त्यातील 25/25 ग्रॅमचे दोन नमुने बाजुस काढावेत व त्यातील 25 ग्रॅमचा नमुना पॅकेट रासायनिक विश्लेषणास पाठवावा व दुसरे पॅकेट राखीव नमुना म्हणुन मालखान्यात जमा करावा.
- अंमली पदार्थाची पावडर जर 10 ग्रॅम असेल तर 5/5 ग्रॅमची दोन नमुना पॅकेट तयार करावेत व एक पॅकेट रासायनिक विश्लेषणास पाठवावे.
- आरोपींच्या झडतीत सापडलेल्या मुद्देमालास व त्यातील रासायनिक विश्लेषणासाठी व राखीव ठेवण्यासाठी काढलेल्या मालास क्रमांक देण्यात यावा.
- जप्त मुद्देमालाच्या पाकीटावर पंचाच्या सहीचे लेबल लावावे, लाखेवर पितळी मोहर उमटवली जावी व जप्त करणार्या अधिकाऱ्याची सही झाली हे तपासून घ्यावे.
- जप्त मुद्देमालाची पाकीटावर पंचांच्या सहीचे लेबल, ब्रास सिल (पितळी मोहर) इत्यादी उमटवून त्यावर आरोपीची स्वत:ची सही किंवा निशाणी करण्याची त्याची इच्छा असल्यास सही घ्यावी व तसे पंचनाम्यात नमूद करावे, आरोपीची सही करायची इच्छा नसल्यास तसे पंचनाम्यात नमूद करावे.
- झडती घेतल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाला संबंधी त्याचे वजन, वर्णन, किंमत मिळाल्याचे ठिकाण,जागा ईत्यादीच्या सविस्तर नोंदी जप्ती पंचनाम्यात लिहून पंचाच्या सह्या, जप्त करणारे अधिकारी यांची सही, वजनमापे करणारे ईसमाची नांव व स्वाक्षरी, काढण्यात आलेले सॅम्पलची संख्या व वजन इत्यादी बाबतचे सविस्तर नोंदी पंचनाम्यात नमुद कराव्यात.
- जप्त करण्यात आलेले सॅम्पल व मुद्येमाल हे जप्तीचे जागेवरच पंचाच्या सहीचे लेबल लावुन सील करावे.
- मिळालेल्या मालाचे, घटनास्थळाचे, जप्त करतानाचे, सील करतानाचे वेगवेगळे फोटो घेण्यात यावेत.
- गुन्हयातील सॅम्पल सील करण्यासाठी आतून कापड असलेले कागदाचे जाड लिफाफे वापरावेत.
- पंचनाम्यात व झडतीस प्रत्यक्षपणे खुपच वेळ लागला असला तरी त्यात काहीही बदल न करता पंचनामा सुरु केल्याची व संपविल्याची वेळ जशी आहे तशीच घ्यावी. झडती घेते वेळी उशीर झाला, अंधार पडला तर उजेडाची काय सोय केली याचा उल्लेख करावा, पंचनामा एकाच वेळी, सलग जागेवरच लिहून पुर्ण करावा. त्याच पंचांच्या सहया, पत्ते, व्यवसाय, संमक्ष अधिकारीच्या सहया वस्तूंची किंमत कोणतीही बाब कोरी जागा सोडून नंतर लिहू नये.
- पंचनाम्याची एक प्रत आरोपीस देवुन प्रत मिळाल्याचा उल्लेख करून आरोपीची स्वाक्षरी घेण्यात यावी. कलम 51 (N.D.P.S.Act).
- पंचनाम्याची प्रत दिल्यावर आरोपीची पंचनाम्यावर पोच घेवून परत एकदा पंचाच्या व पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्याने स्वाक्षऱ्या घ्याव्या.
- या नंतर पंचाचे काम संपते.
सदर कायद्यान्वये (कलम 51 (N.D.P.S.Act) अन्वये वॉरंट अटक, झडती व जप्ती या बाबत) कार्यवाही करीत असताना CRPC 1973 अन्वये दिलेल्या सर्व तरतुदी लागू आहेत त्या प्रमाणे कार्यवाही करावी.
- पंचनामा कार्यवाही दरम्यान घेण्यात आलेले फोटो व केलेली व्हिडीओ रेकॉर्डींग त्याची जप्ती पंचनामा Hash Value करून त्वरित सीसीटीएनएस मध्ये अपलोड करावी, तश्या स्टे.डा.नोंदी कराव्यात.
आरोपीस ताब्यात घ्यावे…
- आरोपीस ताब्यात घेतल्याचे तोंडी सांगुन त्याची कारणे सांगितली जावी. त्याला पोलिस स्टेशन ला घेवून जात असल्याचे सांगावे…