घटनास्थळ पंचनामा (spot panchanama)

घटनास्थळ पंचनामा (spot panchanama)

  • घटनास्थळावर भेट दिल्यावर / केलेल्या तपासाबाबत तयार करावयाचे टिपण (दस्तऐवज) म्हणजे घटनास्थळाचा पंचनामा.

पंचनामा करताना तपासी अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवण्यायोग्य महत्त्वाचे मुद्दे..

  • शक्यतो घटनास्थळाचे भागातील दोन इसम पंच म्हणून सोबत घ्यावेत. पंचाना लेखी सुचनापत्र द्यावे.
  • गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, नेहमी पंच म्हणून येणारे, सराईत, गुन्ह्यातील आरोपीचे नातेवाईक, फिर्यादी पक्ष्याचे नातेवाईक, ईत्यादी पंच म्हणून वापरू नये.
  • सरकारी पंच घ्यायचे असतील तर संबंधित कार्यालयास लेखी पत्र देऊन पंचाची नावे त्यांचेच अधिकारी कडून पोच पावती वर लिहून घ्यावी. बोलाविलेल्या ठिकाणी पंच हजर आल्यावर त्यांना हकिगत सांगून, त्यांना सुचनापत्र द्यावे.
  • पंचाना प्रारंभापासून अखेरपर्यंत हजर राहण्यास सांगावे.
  • घटनास्थळावरील जो देखावा पंचाना पाहण्यासाठी बोलावले ते पंचांनी व्यवस्थित निरखुन बघावे. नुसतेच पोलीसांनी सांगितले म्हणुन विस्वास ठेवु नये.
  • घटनास्थळाचे पंचासह निरीक्षण करावे. एखादी बाब दिसल्यास त्यावर चर्चा सुध्दा करावी, म्हणजे ती बाब, साक्षतपासनीचे वेळेस लगेच आठवण/लक्षात येते.
  • पंचाना कसल्याही परिस्थितीत, घर झडती/ अंग झडतीत भाग घेऊ देऊ नका. ते काम फक्त पोलिसांना करण्यास सांगावे.
  • गुन्ह्याचे दृष्टीने महत्वाचे व किंमतीच्या दृष्टीने महाग असणाऱ्या वस्तू वर विशेष नजर ठेवा. (ती आपल्याच पोलीस किंव्हा पंचाकडून गहाळ होण्याची अथवा केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.)
  • पंचानी फक्त पंचनाम्याचे कार्यपद्धतीचे निरीक्षण करावे.
  • पंचनाम्याचे सुरवातीला पंचना कश्याप्रकारे बोलाविले त्याचा व त्यांना हकिगत सांगितली व ते सहमत होवून पंचनामा करीता पंच म्हणुन हजर आल्याचा उल्लेख करावा.
  • त्या नंतर घटनास्थळावर, घटनास्थळ दाखविनारे कोण हजर आहेत त्याचा, किंव्हा परिस्थिती नुसार तुम्ही स्वताःच पंचाचे उपस्थितीत घटनास्थळाची पाहणी (सर्चिंग) केली, याचा उल्लेख करावा.
  • नंतर घटनास्थळाचे वर्णन करून, घटनास्थळावरून जप्ती केलेल्या वस्तूंची यादी पंचनाम्यात लिहावी.
  • वस्तू ची किंमत दाखविताना ती त्या वेळेनुसार अचूक दाखवा. (किंमतीचा अचूक अंदाज येत नसेल तर किंमतीचे पुढे,  अंदाजे शब्द वापरणे योग्य. अंदाजे शब्द वापरतांना किंमतीची range बरोबर असावी या कडे लक्ष द्या.)
  • वस्तू शोध करतांना इतर सामानाची विनाकारण नासधूस करू नका. (जसे दारू करीता पाहणी करताना कपाटातील सर्व समन काढून फेकून दिले, किव्हा धान्याचा ड्रम ढकलून दिला.)
  • पैश्याचे कपाट चेक करताना शक्यतो घराच्या व्यक्तीलाच उघडून दाखवायला सांगा. काही संशयास्पद नसेल तर त्याला घरच्या व्यक्तीलाच कुलूप लावून चावी त्याचेकडेच ठेवायला सांगा. (नाहीतर पंचनाम्याचे काम कमी आणि कुटानेच निस्तरण्यात वेळ जायचा.)
  • पंचनामा लिहिताना त्यात, घटनास्थळाची नासधूस झाली नाही तसेच कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नाही याची नोंद नक्की घ्या. (वाढवा काम नको.)
  • पंचनामा करताना जागामालक/घरमालक किती आक्रमक (aggressive) आहे याचा अंदाज आपणास येतो. त्या – त्या प्रमाणे काळजी घेऊन पंचनाम्यात किंव्हा स्टेशन डायरीत, केस डायरीत नोंदी घेत गेल्या पाहिजेत.
  • तुमची पंचनाम्याची कार्यवाही सुरू असताना घर मालकाने हरकत घेतली व घर मालकाची एखादी कृती गुन्ह्याची असेल तर पोलीस स्टेशनला आल्यावर वरिष्ठांना कळवून त्या प्रमाणे वापशी च्या नोंदी स्टेशन डायरीत घेवून, लगेच गुन्हा दाखल करून मोकळे व्हा. (IPC 504, 506, 323, 324, 353, 307 आवश्यकते प्रमाणे.)
  • आरोपीने केलेल्या कृत्याबद्दल बऱ्याच तपासी अंमलदारांना आरोपीस समज देण्याचा मोह होतो, परंतु आजकाल महाराष्ट्रातील जवळपास सर्व पोलीस स्टेशन ला मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशाने CCTV कॅमेरे लागलेले आहेत त्यामुळे लेखी समज देवुन, प्रतिबंधक कार्यवाही करीता मा. दंडाधिकारी साहेबांचे समोर हजर करणे सुध्द तितकेच कारगर आहे.
  • ज्या प्रकारचा गुन्हा आहे, त्या परिस्थीती मध्ये सापडनाऱ्या पदार्थापेक्षा काही असहज/आक्षेपार्ह्य/अनाकलीय विजातीय पदार्थ दिसत असेल तर त्याचेकडे लगेच दुर्लक्ष करु नका. सहकाऱ्यांसोबत चर्चा करा. (आवश्यकता असल्यास जप्त करुन पुढील कार्यवाही करावी.) (आवश्यकता असल्यास CA ला पाठवावे.)
  • घटनास्थळावरुन शक्यतो Who, What, When, Where, Why, How, Which, Whose या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा. (बयानात व तक्रारीत सुद्धा हे प्रश्न तितकेच महत्वाचे आहेत.)
  • घटनास्थळ आपल्याला बरेच काही सांगुन जातो. तुम्हाला घटनास्थळावरुन मिळालेल्या पुराव्याचे आधारे घटनास्थळावर काय झाले असेल याचे चित्र तुमच्या नजरे समोर आणन्याचा प्रयत्न करा. ( जसे खुनाचे घटनासेथळावर आरोपी आणी मयत/फिर्यादी यांचा संबंध कसा आला असेल त्यातुन आरोपी मयाताचे अंगावर, घटनास्थळावर, किंवा घटनास्थळावरुन हलविल्या गेलेल्या एकाद्या वस्तुवर कशा प्रकारे पुरावा सोडला असेल याचा अंदाज घ्या. तुमच्या मनात आलेल्या त्या अंदाजाच्या बाबी नक्की पडताळुन बघा.)
  • रात्रीचे वेळी पंचनामा करताना, मोबाईल फ्लॉश लाईट, बॅटरी, कंदील, रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात, वाहनाच्या प्रकाशात किंवा इतर कोणत्या प्रकाशात पंचनामा केला, याची नोंद करावी.
  • जर पंचानामा Laptop वर करीत असाल तर,  घटनास्थळावर विज होती काय? असल्यास विजपुरवठा सुरु असल्याची नोंद घ्यावी.
  • गुन्ह्याचे ठिकाणाचा नकाशा संबंधित विभागा कडून काढून घ्यावा. (यात बरेच वाद आहेत.)
  • घटनास्थळ पंचनामा कश्याचे प्रकश्यात व किती वेळ पासून किती वेळ पर्यंत केला याचा उल्लेख करावा.
  • शेवटी पंचांनी पंचनामा वाचून समजून त्यावर सह्या केल्याचा उल्लेख करून त्यावर पंचाच्या सह्या घ्याव्यात.
  1. फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 कलम 157 (1)
  • CRPC कलम 157(1) या  कलमान्वये पोलिसांना गुन्ह्याचे ठिकाणावर जाऊन तपास करण्याचे अधिकार दिलेले आहेत.
  • घटनास्थळावर भेट दिल्याबाबत / केलेल्या तपासाबाबत तयार करावयाचे दस्तऐवज म्हणजे घटनास्थळाचा पंचनामा.
  • फिर्यादीने दिलेल्या तक्रारीला पुष्टी देण्याकरिता व ज्या गुन्ह्यात आरोपी अज्ञात आहे, त्यामध्ये आरोपीचा शोध घेण्याकरिता तो उपयोगी ठरतो. 
  • पंचनामा तपासात व पुराव्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे, त्यामुळे गुन्ह्याच्या ठिकाणाचा पंचनामा करताना तो कसा करावात्याचा उद्देश काय हे प्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे. (तपासी अधिकारीने हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, या पंचनामा चे आधारे तो कोर्ट मध्ये काय सिद्ध करणार आहे? किंव्हा पुढील तपासात तो काही नवीन बाब निष्पन्न करणार आहे काय, ज्या साठी हा पंचनामा उपयोगाचा ठरणार आहे.)
  • जर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यास एखादा दखलपात्र गुन्हा घडल्याच्या खबरीवरून किंवा, एखादा दखलपात्र गुन्हा घडला आहे असे सकारण वाटत असेल व अशा गुन्ह्याचा तपास करण्याकरिता कलम 156 अन्वये तो प्राधिकृत असेल, तर स्वतः जातीने अथवा आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना गुन्ह्याची वस्तुस्थिती पाहण्यासाठी व परिस्थितीच्या तपासाकरिता गुन्ह्याचे ठिकाणी तपास करु शकतो.

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 कलम 100.

कलम १०० नुसार, एखाद्या बंद जागेत शिरण्यास व त्या जागेची झडती घेण्यास वॉरंट बजावणाऱ्या अंमलदारास कोणी मज्जाव करता कामा नये. तसेच आपल्या अंगावर वस्तू लपविल्या आहेत असा संशय आल्यावर सदरहू इसमाची अंगझडती घेण्याचा सदरहू अंमलदारास अधिकार आहे. (या अधिकारास कुणी प्रतिबंध केल्यास आय.पी.सी. कलम 353 प्रमाणे अपराध आहे.)

कलम १००:-

  • झडती घेणाऱ्या अंमलदाराने ज्या ठिकाणी झडती घ्यावयाची असेल ते ठिकाण ज्या भागात येते, त्या भागातील दोन अगर अधिक इसम पंच म्हणून बरोबर घ्यावेत व त्यांना प्रारंभापासून अखेरपर्यंत हजर राहण्यास सांगावे.
  • सापडलेल्या वस्तूंची त्या वस्तू कोठे सापडल्या हे नमूद करून यादी करावी.
  • कोर्टाच्या समन्सखेरीज पंचांना कोर्टात हजर राहण्याची आवश्यकता नाही.
  • ज्या जागेची झडती घ्यावयाची असेल त्या जागेच्या मालकास किंवा त्याच्यातर्फे कोणाही इसमास झडती घेताना त्या जागी हजर राहू दिले पाहिजे आणि पंचनाम्याची एक नक्कल त्याला दिली पाहिजे.
  • एखाद्या इसमाच्या अंगझडतीत त्याच्या अंगावर काही वस्तू सापडल्यास त्या वस्तूंची यादी करून पंचनाम्याची नक्कल त्याला दिली पाहिजे. CRPC 100(3) प्रमाने.
  • पंच म्हणून पुढे येण्याचे वाजवी कारणावाचून कुणी नाकारल्यास त्याने भा.दवि. चे कलम 187 अन्वये गुन्हा केला, असे गृहीत धरले जाईल त्या नुसार कार्यवाही होईल.

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 कलम 165.

  • कलम 165 नुसार, आपल्या तपासात आवश्यक कोणत्याही वस्तु ताब्यात घेण्यासाठी एखाद्या ठिकानची झडती घेण्याचा अधिकार आहे.
  • तसेच स्वताः झडती घेणे शक्य नसेल तर CRPC 165(3) प्रमाणे, आपल्या हाताखालील इतर अधिकाऱ्यास झडती घेण्यास लेखी हुकमाने सांगण्याचा अधिकार आहे.
  • CRPC 165(5) नुसार, कलम CRPC 165(1) व (3) प्रमाणे केलेल्या कार्यवाहीच्या प्रती सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्यास पाठवाव्या, तसेच ज्याचे घराची झडती घेतली त्याचे विनंती अर्जावरुन त्यास विनामुल्य पुरवावी.

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 कलम 166.

कलम 1669 नुसार, आपल्या तपासात आवश्यक कोणत्याही बाबीसाठी दुसऱ्या पोलीस ठाण्याचे ठिकानची झडती घेण्यासाठी त्या संबाधीत पोलीस स्टेशन चे अंमलदारास सांगण्याचा अधिकार आहे.

          झडती घेण्याची खबर ज्याची झडती घ्यायाची आहे त्यास माहीती होवुन संबंधित इसम पुरावा नष्ट करेल असे वाटत असल्यास, प्रथम स्वताः झडती घेण्याचे ठिकानी जावुन तपास करावा व नंतर संबंधित पोलीस स्टेशन ला जावुन संबंधिस ठाणे अंमलदारास आपन केलेल्या तपासाची (पंचनाम्याची प्रत) द्यावी.

घटनास्थळ पंचनाम्याचे न्यायालयात गुन्हा सिद्ध करतांना महत्व..

  • तक्रारीस पुष्टी :- फिर्यादीने तक्रारीत सांगीतलेली परिस्थिती व तपासी अंमलदाराने घटनास्थळ पंचनाम्यात वर्णन केलेली घटनास्थळावरील परिस्थिती एकसारखी असल्यास ती पुराव्याचे दृष्टीने पुष्टिकारक ठरते.
  • गुन्हा घडतेवेळी घटनास्थळाची स्थिती घटनास्थळाचे वर्णन करुन न्यायालयासमोर जसेच्या तसे व ठामपणे सांगता येते.
  • गुन्हा करताना आरोपी काही भौतिक अथवा जैविक पुरावे सोडून गेला असल्यास त्यांचा उपयोग आरोपीविरुद्ध भक्कम पुरावा म्हणून न्यायालयात करता सादर येतो.
  • घटनास्थळावरील असे पुरावे घटनास्थळ पंचनाम्यातच/ किंवा वेगळ्या जप्ती पंचनाम्याने घटनास्थळावरच जप्त करवे. (वेगळ्या जप्ती पंचनाम्याने जप्त करायचे असल्यास मुख्य पंचनाम्यात तसा उल्लेख करावा.)

एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने पांच म्हणून काम करण्यास नकार दिल्यास काय कार्यवाही होते.

पंच, पो. अंमलदार आणि कायदा :-

पो. तपास करणाऱ्या पोलीस अंमलदारास प्रसंगानुसार नागरिकांतील इसमांना पंच म्हणून बोलावून घेणे क्रमप्राप्त ठरते. त्यानुसार हजर होणे नागरिकाचे कर्तव्य आहे. परंतु बऱ्याचदा नागरिक पंच म्हणून पुढे येण्यास नकार देतात. सर्वसाधारणपणे अशा इसमावर पोलिसांना कोणतीच कारवाई करण्याचा कायद्याने हक्क नाही.

परंतु उपरोक्त बाबीला काही प्रसंगी अपवादही आहेत. हा अपवाद पुढीलप्रमाणे :-

  • कोणत्याही जागेची (म्हणजेच वाहन, तंबू, घर, इमारत) झडती घेण्यासाठी पोलीस अंमलदाराला CRPC कलम 100(4) अन्वये पंच बोलावण्याचा अधिकार आहे. त्यास नकार दिल्यास तो CRPC कलम 100(4) चा भंग होईल आणि IPC कलम 187 चा अपराध ठरेल.
  1. जर एखादा सरकारी अधिकारी/कर्मचारी त्यास पोलिसांनी लेखी सुचनापत्र  देऊन सुद्धा, पोलिसांच्या खटल्यात पंच म्हणून भाग घेण्यास तयार नसेल तर ते त्यांच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांचे उल्लंघन करीत आहे असे मानले जाते.
  2. फौजदारी प्रक्रिया संहिता  नुसार, एका पोलीस अधिकाऱ्याला तपासाच्या उद्देशाने सरकारी अधिकाऱ्यांसह साक्षीदारांची उपस्थिती आवश्यक वाटत असेल तर त्यास तसे करण्याचा अधिकार आहे.
  3. असे पोलीसांचे सुचनापत्र मिळाल्यावर त्याचे पालन करण्यात सदर कर्मचारी / अधिकारी अयशस्वी झाल्यास त्यास दंड आणि तुरुंगवासासह दंड होऊ शकतो.
  4. याशिवाय, सरकारी अधिकारी सार्वजनिक सेवक असल्यास, त्यांची अधिकृत कर्तव्ये पार पाडण्यात अयशस्वी झाल्याबद्दल संबंधित सेवा नियमांनुसार त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.

(सारांश, एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने पोलिस खटल्यात पंच म्हणून भाग घेण्यास नकार दिल्यास, त्यांना कायदेशीर आणि शिस्तभंगाच्या परिणामांना सामोरे जावे लागू शकते.)

Leave a Comment